Sunday, January 10, 2016

Pani Kavita Marathi different meanings of water means pani

मराठी भाषेची सुंदरता
खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात.  ही आहे मराठी भाषेची श्रीमंती.  मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ.

रंग पाण्याचे

'पाणी' शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते 'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे, दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या 'पाणी' सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी' भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी' जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी 'पाणी' काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी' पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे 'पाणी' होते
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी' करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब, दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे 'पाणी..पाणी' करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहऱ्यावरती उठे तरंग

pani marathi

pani marathi language

disadvantages of marathi language

water pollution ppt in marathi

gadulach pani marathi song free download

gadulach pani marathi song lyrics

gadulach pani marathi mp3 song free download

gadulach pani marathi dj song download

gadulach pani marathi song video

No comments:

Post a Comment